बारामती: शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. दरम्यान पवारांनी लोकसभा विजयाच्या निमित्ताने विधानसभेच्या पेरणीला सुरुवात केली आहे. बारामतीमधील लोणी भापकर गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, “जे काम करायचं होतं ते तुम्ही केलं, मला काही सांगायची वेळ आली नाही. मोदींपेक्षा जास्त मताने तुमचा खासदार निवडून आला आहे. मोदी सांगायचे मोदी की गॅरंटी. पण उनकी गॅरंटी यहा चली नही, मोदींनी काय माझा बांध कोरला नाही. पण, मोदींचे धोरण आपल्या हिताचे नव्हते. शेतकरी अडचणीत कसा येईल याचा विचार मोदी सरकार करते.
दमदाटी केली तरी कोणतं बटण दाबायचे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, ते तुम्ही दाबलं. या निवडणुकीत एकही पुढारी नव्हता, कुठं गेले होते काय माहित? मी विचारायचो हे होते का, ते होते का, ते कुणीही नव्हतं. कळलं नाही नेत्याला काय झालं? जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा कळलं? आता हा चमत्कार विधानसभेला करायचा आहे. एक चमत्कार तुम्ही करायचा एक चमत्कार मी. पहिले पाणी आणायचं, मग कोणतं कांडे रोवयाचे आणि कोणता डोस कधी द्यायचा हे मी सांगतो ” असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंगही पवारांनी फुंकले आहे .




