पुणे : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १२ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता ११ जागांवर कोणाला संधी दिली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रवादीने ( अजित पवार गट ) या ११ मध्ये पुण्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सातव (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. यातील पुण्यासाठी एक जागा घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेत केली आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबईत थेट अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. विधानसभा निवडणुक चार महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी परिषदेची एक जागा हवीच आणि ती पुण्याला मिळावी, असा युक्तिवाद पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.




