
पुणे : गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावरील एल थ्री बारमधील पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना पुण्यातील अमली पदार्थ तस्कराने मेफेड्रोनचा पुरवठा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या तस्कराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये (एनडीएपीएस) कलमवाढ केली असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.
एल थ्री बारमधील पार्टीत तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी कारवाई करून बारच्या जागामालकासह आठ जणांना अटक केली. पार्टीत मेफेड्रोनचे सेवन करणारे नितीन ठोंबरे आाणि करण मिश्रा यांनाही अटक करण्यात आली. आतापर्यंत दहाजणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी ठोंबरे आणि मिश्रा यांनी पुण्यातून मेफेड्रोन खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यांना मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या तस्कराचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त गिल यांनी सांगितले.




