
अलिबाग – मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती लागली आहे. बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी तातडीने काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आता आयआयटीच्या तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्यांची निर्मिती केली आहे. यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. यामुळे तळ कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे दिसून येत आहे. बोगद्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे सुरू आहेत.
त्यामुळे प्रवाशी आणि वाहनचालक धास्तावले आहेत. कारण पावसाचे प्रमाण वाढले की फवारे आणखी मोठे होत आहेत. ही गळती कशी थांबवायची असा प्रश्न महामार्ग विभागाला पडला आहे. पावसाचे गळणारे पाणी थेट खाली वाहनांवर पडू नये म्हणून पन्हळ लावून पाणी बोगद्याबाहेर काढले जात असून ही तात्पुरती व्यवस्था केली असली तरी यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.



