पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुफळीनंतर बहुतांश नगरसेवक पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने राज्यात यश मिळवले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये चिंचवड व भोसरी दोन्हीही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये पक्षांतराच्या हालचाली सुरू झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 16 नगरसेवकांनी काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीमध्ये निर्णायक बैठक झाली असून, येत्या ५ जुलैरोजी पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.
“राम कृष्ण हरी” अजित दामोदर गव्हाणे
नुकत्याच पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी वारकऱ्यांना अनेक गांधी टोपी वाटप करण्यात आले होते. यावरती “राम कृष्ण हरी” अजित दामोदर गव्हाणे अशा आशयाचे टोप्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गत लोकसभा निवडणुकीत “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी” हे वाक्य संपूर्ण राज्यात गाजले होते. आता हीच धून पिंपरी चिंचवड शहरात विशेषतः भोसरी विधानसभेत वाजणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भोसरी विधानसभेत ‘तुतारी’ निश्चित…
दरम्यान, अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. कारण, अजित गव्हाणे यांच्यासोबत विलास लांडे यांचा मुलगा माजी नगरसेवक विक्रांत लांडे बैठकीला उपस्थित होते. तसेच, लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह 15 पदाधिकारी ही शरद पवारांच्या तालमीत परतण्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु, महाविकास आघाडीमध्ये या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. परंतु, लांडे आणि गव्हाणे यांचा शरद पवार गटातील संभाव्य प्रवेश पाहाता ही जागा ‘तुतारी’वर लढण्याचे निश्चित झाल्याचे चित्र आहे.




