- रेड झोन भागातील टीडीआर प्रश्न मार्गी लागणार हे दिसताच पत्रकबाजी…
- माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या पाठपुराव्यावर अजित पवारांनी दिले निर्देश
पिंपरी : तळवडे चिखली भागात रेड झोन हद्दीत शिव रस्त्याबरोबरच इतर रस्त्यांसाठी भूसंपादन केलेल्या जमिनीसाठी ‘टीडीआर’ स्वरूपात १०० टक्के मोबदला देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्य सचिव आणि महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने नगर विकास विभागाकडे ७ मार्च २०१४ रोजी जा.क्र.नरवि/कावि/४९/२८/२०२४ प्रमाणे मागणी केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे चिखली-तळवडे भागांतील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहे.
माजी नगरसेवक पंकज भालेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अनेक दिवस सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येणार आहे. तळवडे येथील रेड झोन भागातील रस्त्याच्या भूसंपादनासाठी मिळणारा टीडीआर शहराच्या इतर भागाप्रमाणे म्हणजेच दुप्पट मिळावा यासाठी पंकज भालेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र दिले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तसा प्रस्ताव आयुक्तांना तात्काळ शासनाकडे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार आयुक्तांनी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला तो प्रस्ताव मंत्रालयात नगर विकास विभागाकडे 14 मार्च रोजी दाखल केला. त्यानंतर पंकज भालेकर यांनी महापालिकेचा प्रस्ताव सादर केल्याचे व त्यावर त्वरित पुढील कारवाई करण्याचे दुसरे पत्र अजितदादा पवार व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना दि. 22 मार्च 2024 रोजी दिले. यावर अजितदादांच्या सूचनेनुसार नगर विकास विभागाने या प्रस्तावावर नगररचना व मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे अभिप्राय मागितला. त्यानुसार या विभागाकडून अभिप्राय पाठवण्याचे काम चालू आहे.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चार महिन्यानंतर भोसरीचे आमदार यांना याबाबत साक्षात्कार झाला. त्यांनी न केलेल्या कामासाठी श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे अशी टीका स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांनी केली आहे. याच विषयावर त्यांनी पावसाळी अधिवेशनात पुन्हा पत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करत स्टंटबाजी करताना दिसून आले. मात्र, नगर विकास खात्याचे मंत्री असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून पाठपुरावा अगोदरच सुरू आहे हे त्यांना माहीत नाही.

काय म्हटले आहे पत्रकात…..
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत देहूरोड दारुगोळा भांडार आणि दिघी मॅगझिन डेपोच्या सीमाभिंतीलगत संरक्षण विभागाने ‘रेड झोन’ घोषीत केला आहे. रेड झोन प्रभावित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राइट्स (TDR) व एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. संरक्षण विभागाच्या अधिसूचनेनंतर महानगरपालिकेने प्रतिबंधीत क्षेत्रामधील बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. मात्र, प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये मंजूर विकास योजनेमधील रस्ते शहरामधील इतर रस्त्यांशी जोडले असल्यामुळे विकसित करणे आवश्यक आहे, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे.
खरंतर याबाबत स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांनी पाठपुरावा करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून याबाबतचा निर्णय व कागदपत्र पूर्तता महापालिका आयुक्तांच्या सोबत समन्वय करून राज्याच्या नगर विकास खात्याकडे दिली आहेत. सध्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पालखी प्रस्थान सोहळा आहे. या सोहळा दरम्यान संपूर्ण इंद्रायणी प्रदूषणामुक्त करण्यासाठी ठोस उपाय योजना मांडण्याची गरज सोडून झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी आमदार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रकबाजी करताना दिसून आले.
पालिकेने नगरविकास विभागाकडे पाठव प्रस्ताव….





