पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ससून रुग्णालयातील कारभाराचे पडसाद गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात उमटले. हे रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याची टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिले. त्यावर विरोधकांनी टीकेचा मारा केल्यानंतर वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ससूनमधील सुविधा आणि सद्या:स्थितीबाबत शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रुग्णालयाचा पाहणी दौरा करण्याचे जाहीर केल्यानंतर विरोधकांचे समाधान झाले.
विधिमंडळाच्या चर्चेत हा विषय आल्यानंतर आमदार धंगेकर आक्रमक झाले. ते म्हणाले की, या रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. हे रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. येथे गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत. या दोन्ही कारणांमुळे ‘ससून’चा लौकिक खालावत आहे.
या रुग्णालयाचा कारभार कधी सुधारणार? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन सभागृहाला दिले. त्यानंतर ससूनमधील सुविधा आणि सद्या:स्थितीबाबत शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
‘ससून’मध्ये लवकरच कर्करोग रुग्णालय
शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, असे आश्वासन वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिले.
ससून रुग्णालयाच्या परिसरात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव बारा वर्षांनंतरही रखडला आहे. बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही ससूनमध्ये उपलब्ध नाहीत. विनामूल्य औषधे मिळण्यासाठी पुरेसा निधी असतानाही ती रुग्णालयामार्फत न पुरविता रुग्णांना ठराविक खासगी मेडिकल दुकानातून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे, असे विविध मुद्दे आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केले होते




