हाथरस येथील चेंगराचेंगरीप्रकरणी अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी सत्संगाच्या आयोजनात सहभाग असलेल्या सहा सेवादारांना (कार्यकर्ते) अटक केली. यात दोन महिलांचाही समावेश आहे. मात्र या सेवादारांचा प्रमुख अजूनही फरार आहे. तसेच, गरज पडल्यास स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू सूरजपाल ऊर्फ नारायण साकार हरी ऊर्फ भोलाबाबाला चौकशीसाठी बोलाविले जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अटक करण्यात आलेले हाथरस, फिरोझाबाद आणि मैनपुरीतील रहिवासी आहेत. एफआयआरमध्ये नाव असलेला सातवा आरोपी देवप्रकाश मधुकर फरार आहे. त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले असून त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचे इनाम लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती अलिगडचे पोलीस महानिरीक्षक शलभ माथूर यांनी दिली.
भोलाबाबाविषयी बोलण्यास नकार
मात्र माथुर यांनी भोलाबाबाविषयी स्पष्ट बोलण्यास नकार दिला. त्याचे नाव अजूनही एफआयआरमध्ये का नाही, या प्रश्नावर त्यांनी ‘तशी मागणी झालेली नाही’ असे उत्तर दिले. अटक झालेल्या सेवादारांनी पोलिसांना या घटनेचे छायाचित्रण आणि चलचित्रण करण्यास मज्जाव केला. तसेच त्यांना धक्काबुक्की केली असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, दुर्घटनेतील सर्व १२१ मृतांची ओळख पटली असून मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आल्याचे गुरुवारी हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये ११३ महिला, दोन पुरुष, सहा लहान मुलांचा समावेश आहे.




