लोणावळा : एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटातील नवीन बोगद्यात आज शुक्रवारी (दि. 05) दोन कंटेनर आणि एक गॅस टँकर एकमेकाला धडकून विचित्र अपघाता झाला. या अपघातात गॅस टँकरच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कार कंटेनर वरील चालक पळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस हावयेवर किलोमीटर क्र. 39 याठिकाणी नवीन बोगद्यात कार घेऊन जाणारा कंटेनर (क्र. NL 01 AD 3146) पुढे चाललेल्या एलपीजी टँकरला (क्र. MH 04 HD 9198) मागून जोरात धडकला. या धडकेने गॅस टँकर पुढे चाललेल्या ट्रेलर कंटेनरला (क्र. MH 43 CE 3217) जाऊन धडकला. यात गॅस टँकर वरील चालक अक्षय वेंकटराव ढेले (वय 30, रा.अहमदपूर – कुमठा, जि.लातूर) हा गाडीमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर काही काळ गॅस टँकर मधील गॅस गळतीची शंका निर्माण झाली होती. मात्र केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांनी अपघातात बाधित झालेल्या टँकरचे पूर्ण परीक्षण केले. सदर टँकर हा रिकामा असल्याने कोणतीही लिकेज घटना घडली नाही. त्यानंतर सर्व अपघातग्रस्त वाहणे बोगद्यातुन पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आणि आय आर बी पेट्रोलिंगच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती. अपघातातील मयत यास लोकमान्य रुग्णालयाच्या ॲम्बुलन्स मधून खोपोली नगरपालिका दवाखान्यामध्ये रवाना केले आहे. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी या अपघातात मदत कार्य केले.




