चाकण : खालुंब्रे (ता. खेड) येथील गणेश अनिल उर्फ अण्णा तुळवे (वय 30 वर्ष) याचा 1 जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास म्हाळुंगे बाजूकडून दुचाकीवरून तो त्याच्या भाच्यासह खालुंब्रे बाजूकडे जात असताना गणेशचा आरोपींनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला होता.
गणेशचा भाचा प्रणय ओव्हाळ याच्यावरही त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी कोयत्याने वार केला होता. परंतु, त्यात ओव्हाळ बचावला. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला होता. या खून प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली. आर्थिक व्यवहारातून चक्क डॉक्टरचा एकावर जीवघेणा हल्ला; लाथाबुक्क्यांनी मारहाण, आई-वडिलांसह पत्नीला शिवीगाळ केली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गणेश तुळवेच्या खून प्रकरणी आरोपी विशाल पांडुरंग तुळवे, (वय 37, रा. खालुंब्रे, ता. खेड), मयूर अशोक पवार (वय 30 रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), रणजित बाळू ओव्हाळ (वय 22, रा. खालुंब्रे ता. खेड) प्रथम सुरेश दिवे (वय 21, रा. म्हाळुंगे, ता. खेड), विकास पांडुरंग तुळवे (वय 35, रा. खालुंब्रे), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय 38, रा. खालुंब्रे), सनी रामदास तुळवे (वय 26, रा. खालुंब्रे) या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी खून केल्यानंतर आरोपी रिक्षामधून फरारी झाले होते. या फरारी आरोपींचा पोलिसांनी तीन पथके तयार करून शोध घेतला. आरोपींनी गणेशचा खून केल्यानंतर लोणावळा मार्गे ते मुंबई येथे गेले होते. त्याबाबत तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मुंबई येथे गेले. तेथून आरोपी पसार झाले होते. आरोपींच्या ठाव ठिकाण्यांबाबत काही एक माहिती मिळत नसताना शोध पथकातील हवालदार तानाजी गाडे, विठ्ठल वाडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. सर्व आरोपी हे जांबवडे ता. मावळ, जि. पुणे येथे एका घरात लपून बसले आहेत. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी शोध पथकाच्या मदतीला सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पाठवून आरोपींना लपलेल्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई पिंपरी -चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, अमोल बोराटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कुथे करत आहेत.




