रवींद्र वायकर यांना जोगेश्वरीतल्या भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस पाठापाठ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. सरकारने आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी ठेवलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार क्लिन बोल्ड होणार आहेत हा क्षणही त्यांनी लक्षात ठेवावा असाही टोला लगावला आहे.

काय म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी अहवालात?

 

रवींद्र वायकरांविरोधातलं प्रकरण हे गैरसमजुतीतून आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे दाखल करण्यात आलं होतं. जोगेश्वरी येथील आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर अडचणींत आले होते. मात्र त्यांच्या विरोधात मुंबई महापालिकेने दिलेली तक्रार अपूर्ण माहितीच्या आधारे दिली गेली. या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय म्हणाले संजय राऊत?

 

“रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाली आहे. दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहीमला क्लीन चिट मिळणं बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातलं ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतं आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं दंड फुगवून सांगत आहे. या लोकांच्या विरोधात कारवाई करा, खटले दाखल करा हे सांगणारे हेच लोक आहेत. रवींद्र वायकर तर घाबरुन पळूनच गेले. मोदींच्या सरकारमध्ये किंवा या सरकारमध्ये दुसरं काय होऊ शकतं? हे काही कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असाच होतो की आमच्या लोकांविरोधात खोटे खटले दाखल केले, गुन्हे दाखल केले आणि तुम्ही त्यांना पक्षात घेतलं हे तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवर असे खोटे गुन्हे, खटले दाखल करुन आमच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाहीत. ज्यांचं काळीज उंदरासारखं आहे ते पळून गेले असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.