गेल्या दोन वर्षांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक मतदारसंघात तिथल्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. पिंपरी मतदारसंघात भाजपाचे अमित गोरखे इच्छुक होते. परंतु, आता भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे, अण्णा बनसोडे म्हणाले.
प्रत्येक पक्ष त्या त्या मतदारसंघात योग्य उमेदवाराला उमेदवारी देतात. त्यामुळे आता गोरखे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मी पिंपरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवेन. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार करतील, असा माझा ठाम विश्वास आहे. पिंपरी मतदारसंघात मी गेल्या दहा वर्षांपासून काम करत आहे आणि ही अजित पवार गटाची जागा आहे. पिंपरी विधानसभा निवडणुकीत ही जागा अजित पवार गटाला सुटेल यावर माझा ठाम विश्वास आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अण्णा बनसोडे नेमक्या कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. तसेच सर्व पक्षांची दारं त्यांच्यासाठी खुली होती. यावर बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी अजित पवार यांचा कट्टर समर्थक आहे, त्यामुळे माझं ठरलं आहे. कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवलं आहे. पिंपरी मतदारसंघात काम करत असताना मला प्रत्येकाचे फोन येतात. परंतु, जो निर्णय घ्यायला हवा तो मी घेतला आहे. मी अजित पवारांच्या पक्षाकडूनच या मतदारसंघातून निवडणूक लढवेन.




