महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालये, कर संकलन कार्यालये, पाण्याचा टाक्या, विविध उद्याने, शाळा, गोदाम, स्टेडियम, क्रीडांगण, महत्वाच्या मिळकती आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा विभागाकडून कंत्राटी पद्धतीने तब्बल 1 हजार 499 रखवालदाराचे मदतनीस नेमले जातात. तसेच, वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी 175 ट्रॅफिक वार्डन नेमले आहेत. निविदा न काढता रखवालदाराचे मदतनीस आणि ट्रॅफिक वार्डन पुरविणाऱ्या एजन्सींना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेच्या शहरभरात विविध मालमत्ता आहेत. त्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, रखवालदार, रखवालदाराचे मतदनीस नेमले जातात. ते कर्मचारी खासगी एजन्सींकडून नियुक्त केले जातात. एम.के. फॅसिलिटीज सर्व्हिसेस प्रा. लि.चे 367 रखवालदाराचे मदतनीस अ आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मालमत्तेसाठी नेमले आहेत.
- नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या वतीने 374 रखवालदाराचे मदतीस ब आणि ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमले आहेत.
- सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि. कडून 379 रखवालदाराचे मदतनीस क आणि ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमले आहेत.
- क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.तर्फे 379 रखवालदाराचे मदतनीस ड आणि ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील महापालिकेच्या मालमत्तेसाठी नियुक्त केले आहेत. एकूण 1 हजार 499 मदतनीस नेमण्यात आले आहेत.
शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी महापालिकेने ट्रॅफिक वार्डनही नेमले आहेत. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेसतर्फे 88 ट्रॅफिक वार्डन, सैनिक इंटेलिजन्सतर्फे 87 ट्रॅफिक वार्डन असे एकूण 175 ट्रॅफिक वार्डन नेमण्यात आले आहेत. रखवालदाराचे मदतनीस आणि ट्रॅफिक वार्डन पुरविण्याच्या कामाचा कालावधी 3 वर्षे होता. ती मुदत 28 फेब्रुवारी 2024 ला संपली आहे.
त्यानंतर निविदा प्रक्रिया न राबविता या कामास 31 मे 2024 पर्यंत 3 महिन्यांची पहिली मुदतवाढ देण्यात आली. ही मुदवाढ संपली आहे. पुन्हा निविदा प्रक्रिया न राबविता 1 जून 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 अशी ६ महिन्यांची दुसरी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सुरक्षा विभागाने ठेवला होता. मुदतवाढ देण्यास आणि त्यासाठी येणा-या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दली आहे.




