
पुणे : पुण्यातील खडकी भागात घडलेल्या हिट अँड रनमध्ये खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हरीश पुलाजवळ रविवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक सिद्धार्थ उर्फ गोट्या राजु केंगार (वय-24 रा. बोपोडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आता कारमधील इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकंडे केलेल्या चौकशीत त्यांनी एका वाढदिवसाच्या पार्टीत मद्यपान केल्याचे समोर आले आहे. मद्यपान करुन घरी जात असताना सिद्धार्थ हा गाडी चालवत होता. त्याला एका कारने ओव्हरटेक केल्याने त्याला राग आला. त्यामुळे पुढे गेलेल्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने स्वत:ची काम दामटण्याचा प्रयत्न केला आणि अपघात झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या अपघातात समाधान आनंद कोळी (वय-44) यांचा मृत्यू झाला तर पोलीस शिपाई संजोग शाम शिंदे (वय-35) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी केंगार याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी केंगार इतर तिन मित्रांसोबत चारचाकी गाडीतून विश्रांतवाडी धानोरी येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. त्याठिकाणी चौघांनी मद्यप्राशन केले. पार्टी झाल्यानंतर कारमधून ते परत निघाले. त्यावेळी सिद्धार्थ गाडी चालवत होता. खडकी परिसरात आल्यानंतर त्यांच्या कारला दुसऱ्या कारने ओव्हरटेक केले. त्याचा राग सिद्धार्थला आला. रागाच्या भरात त्याने कारचा वेग वाढवून त्या कारचा पाठलाग सुरु केला. परंतु त्याला कार ओव्हरटेक करता येत नव्हती.
त्यामुळे त्याने अत्यंत बेदरकारपणे कार चालवली. बोपोडीत त्या कारला ओव्हरटेक करत असताना गस्तीवर असणाऱ्या कोळी आणि शिंदे यांच्या दुचाकीला पाठिमागून जोरात धडक दिली. धडक दिली त्यावेळी कारचा वेग एवढा होता की कोळी उडून कारच्या काचेवर आदळून बोनेटवरुन खाली पडले. त्यामध्ये कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर केंगार आणि गाडीतील इतर तिघांनी तेथून पळ काढला. पोलिसांना घटनेचा सुगावा लागू नये यासाठी त्यांनी कार लपवून ठेवली. त्यानंतर चौघेजण आपआपल्या घरी निघून गेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले करीत आहेत.




