
भाजपने पिंपरी चिंचवडमधी अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड भाजपमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आनंदोत्सवाची एकही संधी न सोडणाऱ्या निष्ठवंतांनी गोरखे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर साधा जल्लोषही केलेला नाही. उलट उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी नाराजीच्या सुरात एक पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पाठवण्यात आलं. त्याच पत्रावर सर्वांनी सह्या सुद्धा केल्याचं बोललं जात आहे. तथापि, प्रत्यक्षात हे पत्र फडणवीसांना देण्यात आलंच नाही, अशीही चर्चा आहे. मात्र या चर्चेत काही तथ्य नसल्याचं आणि गोरखेंच्या विजयानंतर मोठा जल्लोष करणार असल्याचा दावा हे निष्ठावंत करत आहेत.
दुसरीकडे, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, 12 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस चांगलीच वाढली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना 12वे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता बळावली आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.
कोण आहेत अमित गोरखे?
गोरखे अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी सध्याची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या गैरव्यवहारानंतर चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महामंडळ स्थिरस्थावर करण्याचे काम त्यांनी केले पण कालावधी फक्त चार महिन्यांचा मिळाला.




