- आमदार सुनिल शेळके यांची पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मागणी
वडगाव मावळ :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे निलंबित मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या मालमत्तेची व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी एक आयएएस आणि एक आयपीएस अधिकाऱ्यांची समिती नेमली जाणार आहे. समितीकडून एन के पाटील यांच्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील संपूर्ण कारभाराची चौकशी केली जाणार आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे चौकशीची मागणी केली होती. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन करुन चौकशी करणार असल्याचे सांगितले.
लक्षवेधीमध्ये आमदार सुनिल शेळके म्हणाले, तळेगाव दाभाडे ही ऐतिहासिक नगरी आहे. शहरात 80 हजार पेक्षा अधिक नागरिक वास्तव्य करीत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून एन के पाटील मागील दीड वर्षापासून काम पाहत होते.त्यांच्या कार्यकाळात मागील अनेक दिवसांपासून नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांबाबत तक्रारी करीत होते. अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्याशी पाटील यांचे अर्वाच्य भाषेत बोलणे. महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत असभ्य वर्तन करणे,असे प्रकार करत होते.
निलंबित मुख्याधिकारी एन के पाटील यांच्याबाबत अनेक तक्रारी राज्याच्या नगरविकास खात्याकडे करण्यात आल्या आहेत.दरम्यान, एन के पाटील यांनी मद्यपान करून गाडी चालवून तळेगाव दाभाडे शहरात अपघात केला होता.आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. तक्रारीला तीन महिने झाले तरी त्याबाबत सकारात्मक तोडगा निघाला नव्हता. मागील दोन दिवसांपूर्वी सोमवारी (दि. 8) पाटील यांच्या थेट निलंबनाचे आदेश मिळाले.
मात्र, एन के पाटील मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्या काळात मान्यता दिलेल्या सर्व कामांची चौकशी करावी. त्यांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी लक्षवेधीद्वारे केली.
यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मंत्री सामंत म्हणाले, मुख्याधिकारी एन के पाटील यांनी तळेगाव दाभाडे शहरात दुसऱ्याची गाडी घेऊन अपघात केला. तसेच त्यांच्याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.एक आयएएस आणि एक आयपीएस अधिकारी यांची समिती करुन एन के पाटील यांच्या कार्यकाळामधील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.




