पुणे : एका शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानंतर एक मुलगा लहान वयातच व्यसनाच्या आहारी गेला. जेमतेम कशीबशी बारावी पास केली, त्याच्या वागणुकीमुळे त्रासून, त्यांच्या वडिलांनी त्याला घराबाहेर जायचा आदेश केला. आता स्वतःची सोय स्वतः करायची म्हणून या मुलाने पुण्याला जाणारी गाडी पकडली. पुण्यात आल्या नंतर वर्षभर, दोनवेळच्या जेवणासाठी त्याने रात्रंदिवस काम केले. दुसऱ्या वर्षी महिना १५०० रुपयांच्या पगाराची नोकरी लागल्याने त्याने पुण्यातच राहायचे ठरवले. दररोज ३० किलोमीटरचा प्रवास सायकलवर करून त्यांनी काम केले. त्यानंतर २००१ साली रमेश चौधरी यांनी सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची एका २०० चौरस फूट गाळ्यात स्थापना केली. आज त्यांच्या याच व्यवसायाचे रूपांतर १३ विविध शाखांपर्यंत पोहोचला आहे.
रमेश चौधरी यांच्या याच कार्याची दखल ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’च्या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. राजस्थानच्या नाडोल गावात एका शेतकरी कुटुंबात रमेश यांचा जन्म झाला. त्यांच्या घराला स्वातंत्र्यसेनानींची मोठी परंपरा, कुटुंबात सर्वात लहान असल्याने मोठ्या लाडात बालपण गेले. गावातल्या शाळेतच प्राथमिक शिक्षण सुरू झाले. पुढे वाईट संगतीमुळे अवघ्या १३ वर्षाच्या रमेशला दारू, सिगारेट, तंबाखू, अशी नानाविध प्रकारची व्यसने जडली. स्वातंत्र्यसेनानींच्या घरात असा मुलगा जन्माला आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना टीकेचे धनी व्हावे लागत असे. वडिलांना मुलगा पूर्णपणे वाया जाऊ नये म्हणून एका होस्टेलमध्ये पाठून दिले.
होस्टेलमध्ये वाईट सवई तर सुटली; पण रमेशचा अध्यात्मात खूप रुची लागली. दहावीपर्यंत रमेश या व्यसनातून बाहेर पडले. पुढे आयुष्यातील बारावीचा टप्पा त्यांनी पूर्ण केला. आई- वडिलांनी ‘तुझ्या आयुष्याच्या निर्णय तू घे..’ असे सांगितले. पुढे इलेक्ट्रॉनिक साहित्य दुरुस्तीच्या त्यांनी कोर्स केला. आपल्यामुळे आपल्या कुटुंबीयांना खूप त्रास सहन करावा लागल्याची जाणीव रमेश यांना होती. त्यामुळे आपण मोठ्या शहरात जाऊन काहीतरी चांगला कामधंदा करून आई-वडिलांचे नाव मोठे करण्याचा निश्चय त्यांनी केला.
याच विचारातून रमेश १९९८ साली पुण्यात दाखल झाले. पुण्यातीलच एका नातेवाइकांकडे आश्रय घेतला. पहिले वर्षभर तर फक्त जेवणासाठी काम केले. त्यानंतर एका इलेक्ट्रॉनिक दुकानात १५०० रुपये दरमहा पगाराची नोकरी सुरू केली. त्यासाठी दररोज ३० किमी सायकलवर प्रवास करावा लागत होता, वर्षभर काम केल्यानंतर या कामातून रमेश समाधानी नव्हते. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट त्यांच्या नातेवाइकांना सांगितल्यावर त्यांनी रमेश यांना जाण्यापासून रोखले. “पुण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आला आहे, आता जर हे अपयश घेऊन पुन्हा घरी गेला, तर आयुष्यभर तुझ्याकडे तुच्छतेच्या नजरेने पाहतील. त्यामुळे आता यश मिळवूनच घरच्यांना भेटायला जा’ असा आपुलकीचा सल्ला दिला. त्यांचे म्हणणेही रमेश यांनी ऐकले आणि काम सुरु ठेवले. आता आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा म्हणून रमेशने २००१ साली सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना केली. त्यासाठी कर्ज घेऊन पिंपरी चिंचवडमधील थरमॅक्स चौकात एका छोट्याशा गाळ्यात सूर्या इलेक्ट्रॉनिक या व्यवसायाची सुरुवात केली.
सुरुवातीला सर्व काम स्वतः करायचे, व्यवसायाच्या पहिल्या दिवसापासून सगळे व्यवहार सुरळीत ठेवले. ग्राहकांनी देखील एवढा छोटा मुलगा व्यवसाय करतो म्हणून पाठिंबा दिला. व्यवसायामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणा, कामगारांना आपुलकीची वागणूक आणि काळानुसार बदल है तत्त्व रमेश चौधरी यांनी आत्मसात केले. त्यामुळे एका गाळ्यातून सुरू झालेला सूर्या इलेक्ट्रॉनिक्स दलानाचा प्रवास आता पुणे जिल्ह्यात १३ शाखा सुरू करण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्याकडे तब्बल २७५ कर्मचारी मालकासारखे मोठ्या थाटात सूर्या इलेक्ट्रॉनिकमध्ये काम करतात.
चांगल्या व्यवसायासाठी आरोग्य महत्त्वाचे, सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा
अवघ्या १३ वर्षाच्या वयात लागलेले व्यसन रमेश यांनी पुढे कायमचे सोडले. व्यवसायात यश मिळवायचे असेल तर आरोग्य चांगले हवे, त्यासाठी रमेश चौधरी दररोज योगा करतात. योगगुरू स्वामी रामदेवजी यांना त्यांनी आपले गुरू मानले आहे. सुरुवातीच्या दिवसांत चहा प्यायला देखील पैसे नसल्याने त्यांनी, संकल्प घेतला की, ज्या-ज्या वस्तूंची जगायला आवश्यकता नाही त्याचा उपयोग नाही करायचा. सामाजिक बांधिलकी म्हणून ते एमआर सूर्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करतात.
व्यवसायात संधी खूप आहेत; मात्र त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी. त्याशिवाय कोणालाच काहीच मिळत नाही हे आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे, हल्ली सर्व काही तत्काळ पाहिजे. सध्या प्रत्येकजण यश मिळवण्यासाठी काम करतो. यश मिळाले नाही तर खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे. अनेक व्यावसायिक सर्वांत मोठी चूक करतात ती कामगारांना कामगार समजतात. माझ्या व्यवसायात प्रत्येकजण मालकासारखे आहे. म्हणूनच आजपर्यंत एकही कर्मचारी सूर्या इलेक्ट्रॉनिक्स सोडून गेला नाही.
– रमेश चौधरी,
एमडी, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स.




