वडगाव : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे निलंबन झाल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. साबळे यांनी नगरपरिषदेच्या विविध विभाग प्रमुखांकडून माहिती घेत गुरुवारी (दि ११) सकाळी पदभार स्वीकारला.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यावर मद्य प्राशन करून वाहन चालविणे, तसेच नगरपरिषदेच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी सोमवारी (दि ८) निलंबनाचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे.
दरम्यान, तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे देण्यात आला. साबळे यांनी गुरुवारी सकाळी नगरपरिषदेतील विविध विभागप्रमुखांकडून कामकाजाची माहिती घेत पदभार स्वीकारला.




