- चंद्ररंग चारिटेबल ट्रस्टच्या वतीने वारीदरम्यान आरोग्य सेवेचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ
पिंपरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यात अनेक सेवाभावी संस्था व महापालिका व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने विविध सेवा पुरविण्यात येतात. यामध्ये आळंदी व देहू येथून निघणाऱ्या दोन्हीही पालखी सोहळ्यात सामील होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या आणि चंद्ररंग चारिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य सेवेसाठी दोन पथक सेवा पुरवली जात आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. या वारी दरम्यान पुणे जिल्ह्यातील आळंदी व देहू येथून पंढरपूर हा खूप मोठा प्रवास वारकरी पायी प्रवास करत असतात. यामध्ये राहणे खाणे व्यवस्था ही असते, परंतु ऊन, वारा पाऊस याला सामोरे जात प्रवास करावा लागतो. या प्रवासात वारकऱ्यांना गुढगे दुखणे, सर्दी खोकला, थंडी ताप अशा विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.
दिंडीत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्याचे हाल होऊ हे ओळखूनच पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप आणि विजय जगताप यांनी या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता दोन अंबुलन्स, १२ डॉक्टर आणि इतर कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता पुणे ते पंढरपूर अशी अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. पुणे ते पंढरपूर संपूर्ण पालखी महामार्गावर वारकरी बांधवांना चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट – लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने ही आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून हे सर्व डॉक्टर पुणे ते पंढरपूर पालखी मुक्कामी वारकऱ्यांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा आणि औषधे संपूर्णपणे मोफत देत आहेत.
देहू व आळंदी या दोन्ही पालखी सोहळ्यासोबत वारकऱ्यांच्या सेवेकरीता दोन रुग्णवाहिका आणि सात पिण्याच्या पाण्याचे टँकर ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून सेवेकरिता देण्यात आले आहेत. यंदा ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येत आहेत. तसेच विठ्ठलाच्या भेटीस जाणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यात वेगळाच आनंद आहे.
मा.शंकरशेठ जगताप
चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष
शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर भाजपा




