पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयापूर्वी ज्या-ज्या शासकीय खात्यांत प्रशिक्षणासाठी गेल्या त्या त्या ठिकाणी त्यांनी अवास्तव मागण्या केल्याच्या तक्रारी आहेत. शासकीय कोषागार कार्यालयात त्यांनी स्वतंत्र दालन, वाहनाची मागणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुळशी तालुक्यातील जमिनीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. जिल्हा न्यायालयात त्या प्रशिक्षणालाच हजर राहिल्या नसल्याचे समजते.
शासकीय कोषागार, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा न्यायालय या शासकीय खात्यांत त्या प्रशिक्षणासाठी गेल्या असता, तेथे काय काय झाले, याचे स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आहेत. त्यावरून या धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत. खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात निवड झाली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. ३ जून २०२४ रोजी खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. या ठिकाणी त्यांनी केलेल्या गैरवर्तनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनीच सविस्तर अहवाल पाठवून राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. इतर शासकीय खात्यांत प्रशिक्षण घेतानाही त्यांचे वर्तन अशाच प्रकारचे असल्याचे आता समोर येत आहे.
जिल्हा कोषागार कार्यालय या ठिकाणी त्यांचे १ ते ५ जुलै २०२४ या कालावधीत प्रशिक्षण होते. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे २४ ते २६ जून या कालावधीत त्यांचे प्रशिक्षण निश्चित करण्यात आले होते. या कालावधीत त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे शासकीय वाहन देण्याची मागणी केली. मात्र, ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारितील विविध पोलीस ठाण्यांसह प्रशिक्षणाशी संबंधित ठिकाणी जाताना शासकीय वाहन न घेता त्या स्वत:चे वाहन घेऊन जात असल्याचे जिल्हा अधीक्षक यांच्या अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे समजते. खेडकर यांचे २७ आणि २८ जून २०२४ रोजी जिल्हा न्यायालयात प्रशिक्षण निश्चित करण्यात आले होते. मात्र, खेडकर या प्रशिक्षणालाच गेल्या नसल्याचे समोर आले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा न्यायालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव?
खेडकर कुटुंबीयांची मुळशी तालुक्यात २५ एकर जमीन आहे. मात्र, ही जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरदेखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. पूजा खेडकर पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रशिक्षणासाठी असताना त्या खासगी वाहनातून पौड पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या जमिनीच्या प्रकरणात त्यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.
तिन्ही अहवाल राज्य सरकारकडे पाठविणार
पूजा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यात ज्या-ज्या शासकीय खात्यांत प्रशिक्षण पूर्ण केले, तेथून अहवाल मागविण्यात आला आहे. हे सर्व अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठिवण्यात येणार आहेत. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाकडून केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.




