पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांची नोटीस मिळताच त्यांच्या बाणेर येथील बंगल्यातून आलिशान मोटार गायब झाली आहे. त्याखेरीज बंगल्यातील दुसरी आलिशान मोटारही हलविण्यात आली आहे.
बाणेर येथील बंगल्यात गुरुवारी ही आलिशान मोटार झाकून ठेवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी ही मोटार बंगल्यातून हलवण्यात आल्याचे आढळले. याच मोटारीवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या. त्याखेरीज बंगल्यात असलेली दुसरी मोटारही बंगल्यातून हलविण्यात आली आहे.
परिविक्षाधीन अधिकारी असताना स्वत:च्या मोटारीवर अंबर दिवा लावण्यात येऊ नये, असा केंद्र सरकारचा नियम असतानाही खेडकर यांनी तसे केल्याने त्यांची मोटार चर्चेत आली. पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या मोटारीवर कारवाई करण्यास गेले होते. मात्र, त्यांच्या आईने पोलिसांनाच दमदाटी करून बंगल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर उभे केले. त्यानंतर शुक्रवारी ही मोटार बंगल्यातून गायब झाली.
पूजा खेडकर वापरत असलेली ही मोटार थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा माजी सहकारी हा या कंपनीचा मूळ मालक आहे. मोटारीच्या मूळ मालकाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस त्यांनाही नोटीस बजावण्याची कारवाई करण्याची शक्यता आहे.



