पिंपरी : शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील माजी नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. कार्यकर्त्यांचे म्हणने जाणून घेतले त्यानंतर रविवारी (दि.21) जुलै रोजी पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रविवारी नवीन शहराध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी पदाधिका-यांशी संवाद साधत शहरातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले. शहरातील पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा केली. कोणी पक्ष सोडून गेले म्हणून खचून जाऊ नका, असे सांगत कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढविला. शहराध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, नाना काटे यांच्या नावावर चर्चा झाली. त्यापैकी एकाच्या नावावर रविवारच्या मेळाव्यात शिक्कामोर्बत केले जाण्याची शक्यता आहे. रविवारी (दि.21) काळेवाडीतील रागा पॅलेस येथे पक्षाचा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक पक्षांतर करण्याच्या तयारीत असताना शरद पवार आणि अजित पवार याच्या पिंपरी चिंचवड शहरात दौरे वाढलेले दिसून येत आहेत.




