पिंपरी – विवादित आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाला आणखी धक्का बसला आहे. तळवडे येथील खेडकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड कंपनीला महापालिकेने सील केले आहे. थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकविल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शु्क्रवारी (दि. १९) सील ठाेकले आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख ७७ हजार रूपयांची कराची थकबाकी आहे.
तळवडे गावठाण, ज्याेतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोव-यात अडकली आहे. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातची सर्व कागदपत्रे तपासली आहेत.
कंपनीमार्फत २००९ पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर २०२२ मध्ये भरण्यात आला. त्यानंतर कर भरला नाही. कंपनीने दोन लाख ७७ हजार ७८१ रूपयांचा कर थकविला आहे. त्यामुळे नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आली. कारवाईवेळी प्रशासन अधिकारी नाना माेरे, एल. एम काळे संबंधित गटलिपिक, एमएसएफ जवान उपस्थित हाेते.




