
पिंपरी-चिंचवड शहरात कोसळत असलेल्या जोरदार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे घरात अडकलेल्या तेरा नागरिकांची अग्निशमन विभागाने सुटका केली.
शहरात पावसाने गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे ठीक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाचा फटका पिंपरी-चिंचवड मधील सर्वच भागाला बसला आहे. नदी काठच्या संजय गांधीनगर, आंबेडकर कॉलनी, सुभाषनगर परिसरातील नागरिकांना कमला नेहरू शाळा,वाल्मिकी आश्रम व कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
सांगवी भागातही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी आले होते. घरांमध्येही पाणी शिरले होते. जुनी सांगवीतील मधूबन लेनमध्ये पाण्यामुळे काहीजण अडकले होते. पावसामुळे घरात अडकलेल्या तेरा नागरिक व दोन मांजरांची अग्निशमन विभागाने सुटका केली. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.




