- आम्ही उपाशी मरायचं का? … हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचा आक्रोश
- सततच्या पर्यटन बंदीमुळे लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला घरघर
लोणावळा : पर्यटन नगरी म्हणूनच जगभरात ओळख असलेलं लोणावळा शहर आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसराची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र चार आठवड्यापूर्वी अनपेक्षित घडलेल्या भुशी धरण अपघातानंतर येथील या पर्यटन व्यवसायावर अक्षरशः दृष्टचक्र फिरले आहे. आधी हा अपघात आणि नंतर पावसाचे कारण देत प्रशासनाकडून येथील पर्यटन स्थळांवर अनेक प्रतिबंध लागू करण्यात येत आहे. या प्रतिबंधाखाली येथील हातावर पोट असलेला व्यावसायिक अक्षरशः पिळवटून निघाला आहे. प्रशासनाच्या या प्रतिबंधामुळे पर्यटकच जर इकडे फिरकले नाही तर आम्ही आमचं, आमच्या बायका मुलांचं, कुटुंबाचं पोट कसं भरायचं? आम्ही उपाशी मरायचं की फाशी घेऊन मरायचं? प्रशासनाने एकदा याचं उत्तर द्यावं असा आक्रोश येथील व्यावसायिक करू लागले आहे.
लोणावळा शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणांवर छोटे मोठे व्यवसाय करीत हजारो कुटुंब आपलं पोट भरत असतात. लोणावळा शहर आणि मावळ परिसर हा मुख्यत्वे पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जातो. जुलै आणि ऑगस्ट महिना हा येथील पर्यटन व्यवसायाचा सर्वाधिक गर्दीचा आणि भरभराटीचा काळ असतो. संपूर्ण वर्षभर पर्यटक येतील, न येतील या जरतरच्या फेऱ्यात अडकलेले येथील व्यावसायिक सर्व कसर या दोन महिन्यात काढत असतात. खरंतर या दोन महिन्यात होणाऱ्या व्यवसायावरच त्यांचे वर्षभराच नियोजन ठरलं जातं. चिक्की व्यावसायिक, टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिक, रिक्षा चालक, वडापाव, भजी, चहा, शेंगा, मक्याची कणसं विकून आपला चरितार्थ चालवणारे व्यावसायिक या दोन महिन्यांच्या सुरुवातीलाच आपली सर्व जमपुंजी व्यवसायात गुंतवत असतात. आणि यातून मिळणाऱ्या नफ्यावर वर्षभर मुलांची शाळा, घरातील जेष्ठांचे, लहानांचे दवाखाने, नात्यागोत्यातील, स्वतःच्या मुलाबाळांची लग्न, इतर समारंभ, जबाबदाऱ्या पार पाडत असतात.
कोविड काळात अनेक संकटांना मात देत कसंतरी बाहेर पडलेल्या आणि स्वतःच्या संसाराची गाडी परत रुळावर आणण्यासाठी धडपड करणाऱ्या येथील या छोट्यामोठ्या व्यावसायिकांना यावर्षी प्रशासकीय आदेशांचा असा मार पडत आहे की या लोकांना यातून बाहेर पडण्याचा मार्गच मिळत नाहीये. भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात पाच जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्या अपघाताशी काहीही संबंध नसतानाही प्रशासनाचा सर्वात पहिला हातोडा पडला तो भुशी धरणावर छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर. हे कमी होते की काय म्हणून नंतर दुसरा हातोडा पडला पर्यटन स्थळांवर. येथे पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून तब्बल चार दिवस केवळ लोणावळाच न्हवे तर संपूर्ण मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंध घालण्यात आले. यामुळे पर्यटक इकडे फिरकलेच नाही, आणि जे आले त्यांना परत पाठवलं गेलं. पण ज्या हवामान खात्याच्या अंदाजावर येथे पर्यटन बंदी लागू करण्यात आली त्या हवामान खात्याचा सर्व अंदाज खोटा ठरवत येथे पाऊस पडलाच नाही.
लोणावळा आणि मावळ तालुक्यात पाऊस कमी झाल्याने 27 जुलै रोजी प्रांत अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढीत बंदी मध्ये शिथिलता आणत 27 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून पर्यटन स्थळ खुली केली. मात्र काही तासातच पुन्हा एकदा अचानक दुसरे परिपत्रक काढीत हवामान खात्याचा दुजोरा देत पुढील काही दिवस ऑरेंज आणि यलो अलर्ट असल्याचे सांगत 27 जुलैच्याच रात्री 12 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले. खरंतर लोणावळ्यासाठी आणि येथील स्थानिकांसाठी पाऊस नवीन नाही. याहीपेक्षा जास्त पाऊस यापूर्वी पडायचा, पण पूर्वी असे आदेश कधीच काढले गेले न्हवते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटक पुढील वेळी इकडे येताना हजारवेळा विचार करेल आणि याचा एकंदरीत परिणाम येथील पर्यटन व्यवसायाला घरघर लागण्यात होईल अशी भीती जाणकार व्यक्त करीत आहे. त्यामुळे लोणावळेकर नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. एकमेकांसोबत बोलून, व्हाट्स अप ग्रुपवर, सोशल मीडियावर अनेकजण उघडपणे आपला राग व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लोकांच्या भावना जाणून योग्य निर्णय घेण्याची आणि ही अनावश्यक बंदी मागे घेण्याची आवश्यकता आहे.




