मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या राजकारणात प्रवेश करणार असून मलबार हिल परिसरात त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वीकृती शर्मा यांच्या ताफ्यात 50 गाड्या, 25 बसेस आणि 100 हून जास्त बाईक्सचा समावेश आहे.
मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट यांनी 2019 साली उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ॲंटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रदीप शर्मांच्या नंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या राजकारणात एन्ट्री करणार असून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. कार्यकर्त्यांसह त्यांच्या गाड्यांचा ताफा मलबार हिलमध्ये पोहोचल्यानंतर वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
अंधेरी पूर्वमधून निवडणुकीच्या रिंगणात?
प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे तिकीट हे निश्चित असल्याचं सांगितलं जातंय. मात्र स्वीकृती शर्मा या नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
अँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मा जामिनावर बाहेर
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.
लखन भैय्या प्रकरणात प्रदीप शर्मांना दिलासा
लखन भैया कथिक एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्च 2024 रोजी मोठा निर्णय देत प्रदीप शर्मा यांना दणका दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची दोष मुक्ती रद्द करत दोषी आढळल्याचं सांगत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना दिलासा देत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.



