पुणे / पिंपरी : खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने विश्रांतवाडी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी आणि अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्रीपासूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.
पूरग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पथकाच्या माध्यमातून शनिवारी रात्री आठपासूनच प्रयत्न सुरू आहे. यात विश्रांतवाडी भागातील शांतीनगरमधील नागरिकांना संभाव्य धोका विचारात घेऊन अभियांत्रिकी आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने मनपा शाळेत स्थलांतरित केले आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या, बोट, १५ कर्मचारी, १० इंजिनियर यासह आवश्यक ती यंत्रणा पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. यासाठी अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचे पथक कार्यरत आहेत.
यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे निर्देश
या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सर्व यंत्रणांना निर्देश दिले असून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथके पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. शनिवारी रात्रीपासूनच पीएमआरडीएची यंत्रणा सतर्क असून विश्रांतवाडी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहात प्रशासनाच्या पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन करत यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

आयुक्त डॉ. योगेश म्हसे पोहोचले पूरग्रस्त भागात
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने विश्रांतवाडीसह काही परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे शनिवारी रात्रीच पूरग्रस्त भागात पोहोचले. यादरम्यान त्यांनी परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांना पथकाच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी हलवले. स्वतः आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पूरग्रस्त भागाला भेटी देत नागरिकांना दिलासा दिला. यासह पीएमआरडीएची यंत्रणा आपल्यासोबत असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले.




