देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या काही नावांमध्ये समावेश असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदाणी यांनी ते अदाणी समूहाची सूत्र कधी व कशी त्यांच्या वारसांकडे सोपवणार आहेत, यासंबंधी मोठं भाष्य केलं आहे. यानुसार, कोणत्या वर्षी ही सूत्रहस्तांतरण प्रक्रिया पार पडेल, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

गौतम अदाणी हे अदाणी समूहाचे अध्यक्ष आहेत. देशभरातील अनेक मोठ्या व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अदाणी समूहाचा व्यापक वावर आहे. मग ते बंदरांच्या नियोजन व व्यवस्थापनाचं क्षेत्र असो, बांधकामाचं क्षेत्र असो, इंधन निर्मितीचं क्षेत्र असो किंवा शस्त्रास्त्र व्यवसायाचं क्षेत्र असो. अदाणी उद्योग समूहाकडे देशभरातील अनेक राज्यांमधील व थेट केंद्र सरकारचेही अनेक प्रकल्प आहेत. एवढ्या मोठ्या उद्योग समूहामध्ये खांदेपालट होणार असल्यामुळे हा बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे.