
मुंबई : नजीकच्या भविष्यात राज्याच्या विकासात्मक वाटचालीच्या दृष्टीने आवश्यक धोरणात्मक सल्ले आणि संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेची महाराष्ट्र इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा)च्या वतीने लीड नॉलेज इंस्टीट्युट म्हणून आज नेमणूक करण्यात आली. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) ही अशा प्रकारची देशातील पहिलीच संस्था आहे.
आज मुंबई येथे ‘मित्रा’ या संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीदरम्यान महाराष्ट्र इन्स्टीट्युट फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.




