आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारं येईल आणि उद्धव ठाकरे हे त्या सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर महाविकास आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. पटोले म्हणाले होते, मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी एखादं वक्तव्य केलं तर ते आम्ही गांभीर्याने घेऊ. अन्यथा इतरांच्या वक्तव्यांबद्दल विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “नाना पटोले यांचं म्हणणं बरोबर आहे. परंतु, २०१९ च्या निवडणुकीनंतर मीच म्हणालो होतो की उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील. नाना पटोले त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांनी केलेलं वक्तव्य देखील बरोबर आहे. महाविकास आघाडीचं सरकार येऊन आमचाच मुख्यमंत्री होणार आहे. दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी दुसरा कोणता चेहरा असेल तर ते त्यांनी जाहीरपणे सांगावं. काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा असेल आणि त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यता केली तर त्याला माझी हरकत नसेल. काँग्रेसमध्ये चेहरा असेल तर त्यांनी सांगावं की हा आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. नाना पटोले ज्या नेत्याचं नाव सांगतील आम्ही त्याचं स्वागतच करू.



