
नाशिक फाटा ते खेड दरम्यान एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये. या करिता कामाच्या पहिल्या टप्प्यात जय गणेश साम्राज्य स्पाईन रोड, भारतमाता चौक मोशी आणि भोसरी येथील वाहतुकीला अडथळा होवू नये या करिता तीनही प्रस्तावित जंक्शन व सब-वेचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे या प्रकल्पासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रकल्पाची माहिती देण्याकरिता महापालिका भवन येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजर संजय कदम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




