पुणे : पुणे-दिल्ली विमानात दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. वाकड येथील एका महिलेने विमानातील दुसऱ्या प्रवाशासोबत भांडण केले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सीआयएसएफच्या कर्मचारी महिलेला देखील वाकड येथील महिलेने मारहाण केली. तसेच तिच्या हाताला कडकडून चावा घेत जखमी केले.
पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात सुरेखा सिंग (वय 44, रा. वाकड) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीआयएसएफच्या कर्मचारी महिला प्रियांका रेड्डी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत माहिती अशी की, सुरेखा सिंग ही महिला तिच्या पतीसोबत पुणे येथून दिल्लीला विमानाने जात होती.
सुरेखा यांनी बुक केलेल्या सीटवर अवंतिका बोरसे आणि आदित्य बोरसे हे प्रवासी बसले होते. यावरून सुरेखा यांनी त्या दोन प्रवाशांसोबत वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. विमानातील केबिन क्रुने टर्मिनल व्यवस्थापकांना ही बाब सांगितली. त्यानंतर प्रशासनाने सीआयएसएफच्या कर्मचारी प्रियंका रेड्डी यांना याबाबत माहिती दिली.
प्रियांका रेड्डी आपल्या सहकाऱ्यांसोबत विमानात पोहोचल्या. त्यावेळी सुरेखा सिंग यांनी रेड्डी यांना मारहाण केली. तसेच रेड्डी यांच्या हाताला कडकडून चावा घेत त्यांना जखमी केले. रेड्डी यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणानंतर सुरेखा सिंग यांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर एक तास उशिराने विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण घेतले.




