
पिंपरी : शहरात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविणारे भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवारी) मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजविली. महापालिकेत भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले. अशक्य गोष्ट शक्य केली होती. लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवी पुढे आले. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जाते. असे असताना महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर लांडगे कुटुंबातील रवी यांना पदांपासून डावलण्यात आले.
निष्ठावान कुटुंबातील असलेले व बिनविरोध निवडून आले असतानाही रवि लांडगे यांना महापालिकेतील पदांपासून पाच वर्षे वंचित ठेवण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द दिला होता. पण, भाजपमधील अंतर्गत राजकारणाने रवी यांना पदापासून वंचित ठेवले. नाराजीतून त्यांनी एकाही बैठकीला हजर न राहता स्थायी समितीचे सदस्यत्व सोडले. अखेरीस रवी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. परंतु, दोन वर्षे त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. रवी हे मंगळवारी सकाळी 500 गाड्यांसह मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. रवी लांडगे हे भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत.




