
लोणावळा – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा शहरातील विविध समस्यांबाबत मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) आढावा बैठक घेण्यात आली. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.१६) लोणावळा शहरात झालेल्या संवाद बैठकीत अजित पवार यांनी शहरातील समस्यांबाबत विशेष बैठक घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत लोणावळा-खंडाळा शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
तसेच अप्पर मुख्य सचिव, गृहनिर्माण, नियोजन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग, प्रधान सचिव नगरविकास विभाग, सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांसह संबंधित विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
ऑनलाईन टॅक्सी (ओला/उबेर इ.) यांना लोणावळा शहरामध्ये व्यवसाय करण्यास पुर्णपणे बंदी करण्यात आली असून याबाबतचे निर्देश अजित पवार यांनी बैठकीत दिले. त्यामुळे लोणावळा शहरातील स्थानिक रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश मिळाले आहे.
रेल्वे उड्डाणपुलासाठी निधी मिळणार
लोणावळा शहरातील भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाकरीता वित्त विभागाकडून सुमारे १५ कोटी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच जोडरस्त्याचे काम देखील तातडीने करण्याबाबतचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यासह इंदिरा वसाहतीकडे जाणारा रस्ता करण्यास पोलीस विभागाकडून परवानगी देऊन तात्काळ रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिकांच्या रोजगारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
लोणावळा-खंडाळा परिसरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. या पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मध्यतंरी कारवाई करण्यात आली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर भुशी डॅम परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासह लोणावळा नगरपरिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरी उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे सादर केलेल्या प्रस्तावातील कागदपत्रांची पुढील आठ दिवसात छाननी करुन तात्काळ अनुकंपावरील बांधवांना नोकरीची संधी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.
लोणावळा शहरातील सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीए मार्फत एकूण ९ ठिकाणी एसटीपी प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आलेला आहे, त्या प्रस्तावास मंजुरी मिळणेसाठी संबंधितांना निर्देश दिले असुन सदर कामास गती देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठ्याबाबत निर्णय
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेत जुना मुंबई-पुणे महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी नगरपरिषदेकडून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच नगरपरिषद हद्दीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेत पाण्याच्या टाकीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.




