
भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक अशी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमाच आता त्यांची वैरी होते की काय? अशी स्थिती आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात सध्या तशी राजकीय पावले त्या दिशेनेच पडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ते परिचित आहेत. महाराष्ट्रातील पक्षाचे संकट मोचक अशी जाणीवपूर्वक प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
सध्याच्या जामनेर विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात ज्या पद्धतीने विरोधक आडाखे बांधत आहेत. त्याचा विचार करता यंदाची निवडणूक मंत्री महाजन यांना नेहमीसारखी सोपी नसेल. त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहे. आपल्याला विरोधकच नको या भूमिकेतून त्यांनी मतदारसंघातील गजाननराव गरुड शिक्षण संस्थेचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय गरुड या आपल्या पारंपारिक विरोधकाला यंदा फोडले.
आता श्री गरुड भारतीय जनता पक्षात आहेत. श्री गरुड मंत्री महाजन यांचे परंपरागत विरोधक होते. त्यांनी २००९ आणि २०१९ मध्ये महाजन यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. मात्र त्यांचा मतदारसंघावर मर्यादित प्रभाव होता. मंत्री महाजन यांनी गरुड यांना भारतीय जनता पक्षात घेतले. त्याचा उलटा परिणाम त्यांच्या निकटवर्तीयांवर झाला आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्या भोवती राजकीय फास आवळायला सुरुवात केली आहे. या राजकीय चक्रव्यूहात मंत्री महाजन अडकण्याची शक्यता आहे.
सध्या मंत्री महाजन यांच्यावर त्यांचाच राजकीय डाव उलटविण्याची तयारी शरद पवार यांनी केली आहे. मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते दिलीप खोडपे हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. सध्या शरद पवार आणि खोडपे यांच्या निकटवर्ती यांचा संवाद सुरू आहे.



