पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने तरुणाला जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी (दि. ७) मध्यरात्री गहुंजे येथे करण्यात आली.
लखन उर्फ निखिल बाळू आळगे (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार गणेश मालुसरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गहुंजे येथे क्रिकेट स्टेडियमकडे जाणार्या मार्गावर एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून लखन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन हजार रूपये किमतीचे दोन काडतुस जप्त केले. फौजदार खामगळ तपास करीत आहेत.