पिंपरी : विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. दिवाळीनंतर विधानसभेचे निवडणूक जवळपास निश्चित असल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी राजकीय तयारी सुरू केली आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर व सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून अनेकांनी राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
चिंचवड विधानसभेसाठी अनेक इच्छुक
चिंचवड विधानसभेच्या विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप, माजी विरोधी पक्षनते नाना काटे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक राहुल कलाटे, ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, सिद्धेश्वर बारणे, मोरेश्वर भोंडवे, तुषार कामटे, अरुण पवार, राजेंद्र जगताप यांच्यासह अनेक इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
महायुती का महाविकास आघाडी कोणता झेंडा घेणार खांद्यावर….
सर्वाधिक इच्छुकांची संख्या महायुती मधून आहे. मात्र चिंचवड मतदारसंघ कोणाला सुटणार यावरती राजकीय गणित अवलंबून राहणार आहेत. विद्यमान आमदार अश्विनी जगताप व शंकर जगताप भाजपकडून तीव्र इच्छुक आहेत. यामध्ये शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप अनुकूल आहे. त्यामुळे भाजपमधील दहा ते पंधरा नगरसेवक यांनी त्याला विरोध दर्शवत भाजपमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. यामध्ये माजी नगरसेवक संदीप कस्पटे व राम वाकडकर यांनी राजीनामे पक्ष श्रेष्ठींना पाठवले आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत नखाते , बापू काटे, सिद्धेश्वर बारणे यांनी यांना विधानसभा लढवायची असा चंग बांधला आहे. दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर विद्यमान आमदार अश्विनी जगताप भाजपचे दहा ते पंधरा नगरसेवकसह तुतारी फुंकणार अशा बातम्या व्हायरल झाल्या. यामध्ये काहीही तथ्य नाही असे म्हटले जात असले तरीही राजकारणात कुठेतरी आग लागलीच आहे अशी ही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीतील भाजपला सुटेल असे वाटते. महायुतीमध्ये सामील असणाऱ्या अजित पवार गटाकडून इच्छुक असणारे नाना काटे यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात “माढा पॅटर्न” राबवत तुतारी मधून निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांचे निकटवर्ती असणारे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनीही तुतारीकडून निवडणूक लढण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्याच्या प्रमाणे भाऊसाहेब भोईर, शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नाखाते यांनीही महाविकास आघाडीकडे तिकीटासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहे.
एकूणच राजकीय घडामोडी पाहता चिंचवड विधानसभा मतदारसंघात राजकीय उद्रेक केव्हाही होऊ शकतो. मग तो जगताप विरुद्ध जगताप होईल किंवा पोटनिवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा जगताप विरुद्ध काटे व कलाटे अशी तिरंगी लढत पहावयास मिळू शकते. मात्र या लढाईत भाऊसाहेब भोईर व चंद्रकांत नखाते यांनी विधानसभेची तयारी जोरदार सुरू केल्याने ते माघार घेतील अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर अनेकांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई पहावयास मिळणार आहे.




