चिंचवड: चिंचवड मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप भाजपला रामराम करत तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. या चर्चेवर आता स्वतः अश्विनी जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अश्विनी जगताप म्हणाल्या, “माझ्या पक्षांतराच्या बातम्या खोट्या आहेत. कोणीतरी हे वावटळ उठवलं आहे आणि त्याला विरोधक खतपाणी घालत आहेत. माझे पती गेल्यानंतर पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि निवडून आणलं. या माध्यमातून त्यांनी माझ्या पतीला श्रद्धांजली वाहिली. ते आणि देवेंद्रजी खूप चांगले मित्र होते. देवेंद्रजी या भागात आल्यानंतर नेहमी आमच्या घरी यायचे. त्यामुळे पक्ष सोडून जाणं हे माझ्या डोक्यात अजिबात नाही”, असं स्पष्टीकरण आमदार जगताप यांनी दिलं आहे.