
पिंपरी : चाकण परिसरातील रासे गावातील मुंगसे वस्तीत ओढ्याजवळच्या झुडपात मिळालेल्या मृतदेहाचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. भाच्यानेच मित्राच्या मदतीने मामाचा गळा दाबून, तोंडावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याचे उघड झाले आहे. त्यामागील कारण ऐकल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. मामा छोट्या मोठ्या कारणावरुन भाच्याला लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण, शिवीगाळ करत होता. त्यामुळे तो मामाला संपविण्याची संधी गेल्या सहा महिन्यांपासून पहात होता.
संदिप शिवाजी खंडे (वय ४०, रा. ठाकरवाडी, रासे, ता. खेड) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे तर. भाचा सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ (वय ३७, रा. ठाकरवस्ती, रासे, ता. खेड) आणि त्याचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल पांडुरंग अघान अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासे गावाच्या हद्दीत मुंगसे वस्तीजवळील वाडेकर यांचे शेताचे बांधावरील झुडपामध्ये एका पुरुषाचा मृतदेह १९ सप्टेबर रोजी आढळून आला. त्याच्या चेहर्यावर मारहाण करुन जखमा करुन त्याचा चेहरा छिन्नविच्छीन्न केलेल्या अवस्थेत होता. चाकण पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो संदिप खंडे याचा असल्याचे समजले. संदिप खंडे हा आदल्या दिवशी १८ सप्टेबरला कोणाबरोबर होता, त्याचे कोणाशी वाद होते काय याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यात संशयित सुरेश मेंगाळ यानेच हा खून केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. परंतु, त्याच्या बोलण्यामध्ये वारंवार विसंगती येत असल्याने पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली.




