पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान चोरट्यांनी तब्बल 300 मोबाईल चोरून नेले. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी ही चोरी केली. 30 तास चाललेल्या मिरवणुकीत हे मोबाईल चोरीला गेले आहेत. याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थ पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
यात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 91 मोबाईल चोरीला गेले आहेत. दरम्यान फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश व नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून 2 लाख 79 हजाराचे 21 मोबाईल जप्त केले आहेत. गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, कुवळेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
विसर्जन मिरवणूकीला सकाळपासूनच गर्दी होण्यास सुरुवात होते. ती दुसऱ्या दिवशी ३ वाजता संपली. दरम्यान दरवर्षीप्रमाणे चोऱ्या टाळण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तैनात होती. तर इतर बंदोबस्त देखील कडेकोट ठेवला होता. तरीही मोबाईल चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला.
या चोरट्यांनी मिरवणुकीतील गर्दी लक्षात घेत आपला मोर्चा वळवला. तसेच (Pune) अलका चौकातील गर्दीतही हात सफाई केली. एकट्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात विसर्जनाच्या दिवशी 91 मोबाईल चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर उत्सवाच्या दहा दिवसांत 25 मोबाईल चोरीला गेल्याची नोंद आहे. मोबाईल आणि सोन साखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची पथके होती. तसेच पोलीस वारंवार ध्वनिक्षेपकावरुन मोबाईल चोरांपासून सावध रहाण्याचा उदघोष करत होते. मात्र प्रचंड गर्दीचा फायदा चोरट्यांनी चांगलाच उठवल्याचे दिसते.




