एका सायबर गुन्ह्यात तब्बल एक कोटीपेक्षा अधिक रकमेची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे पथक जयपूर येथे गेले. तिथे त्या पथकाने संबंधित आरोपीला निष्पन्न करून ताब्यात घेण्याची कार्यवाही केली असता आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून पोलिसांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी कार मधून पसार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत जयपूर सिटी पूर्व मधील जवाहर सर्कल पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.
एक कोटी आठ लाखांची झाली होती फसवणूक
एसबीआय कस्टमर सर्व्हिसमधील अंकित यादव, मुंबई पोलीस ड्रेस घालून फिर्यादीशी व्हिडीओद्वारे बोलणारे पोलीस, सीबीआय मधील नवज्योत सिम्मी यांनी वृद्ध व्यक्तीची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने पोलीस, सीबीआय अधिकारी व बँक कर्मचारी असल्याची तोतयागिरी केली. सुरेश अनुराग याने अडीच कोटी रुपयांच्या फ्रॉड केसमध्ये अटक करण्याची वृद्ध व्यक्तीला भिती दाखविली. व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कम डिजीटल करन्सी चेक करुन ती व्हेरिफाय करुन परत करतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या एक कोटी आठ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार 4 ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत घडला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.