वाहनधारकांना आपल्या वाहनांची माहिती आता आरटीओ कळवणार असून, थकीत दंडापासून ते योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणापर्यंतचे संदेश प्राप्त होणार आहेत. त्या संदेशांमध्येच लिंकद्वारे संबंधित वाहनधारकाला पुढील प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे. त्या माध्यमातून त्यांना मागणी पत्र प्राप्त होईल. परिणामी, आरटीओ कार्यालयातील हेलपाटे आणि वाहनधारकाचा वेळही वाचणार आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात ही सुविधा वाहनधारकांना २५ सप्टेंबरपासून करण्यात आली आहे, याबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून तो प्रादेशिक परिवहन करण्यात आला. त्यामुळे कार्यालयांतर्गत विविध बदल करण्यात सुरू आहेत. वाहनधारकांना चॉइस नंबरसाठी थेट ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याला वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर वाहनधारकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा मिळाव्यात यासाठी, या कार्यालयाकडून विविध उपयोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता वाहनधारकांना आपल्या वाहनाची माहिती एसएमएसद्वारे मोबाईलमार्फत प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एक लाख वाहनधारकांना थकीत दंडाबद्दल मेसेज पाठवण्यात येणार आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रात वाहनधारकांना वाहनावरील चलनाचा दंड भरणे, थकीत कर भरणे, परवाना नूतनीकरण, योग्यता प्रमाणपत्र व नूतनीकरण अशा विविध कामकाजांची माहिती देण्यासाठी लघु संदेश सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये थकीत कर आणि दंड वसूल करण्याबाबत वाहनधारकांना मोबाईलच्या माध्यमातून नोटीस प्राप्त होणार आहे. यापूर्वी वाहनधारकांना पोस्टद्वारे नोटीस पाठवण्यात येत होती. मात्र त्यामध्ये मोठा विलंब होत होता. तसेच, ती प्राप्त न झाल्याने अनेक वाहनधारकांना त्याची माहिती होत नाही. त्यामुळे आता या सेवेचा फायदा वाहनधारकांना होणार आहे.
दरम्यान, लघु संदेश सेवा अंतर्गत वाहनधारकास सीपी-आरटीओपीसीएम या नावाने लघु संदेश जाणार असून या संदेशामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कार्यालयाचे इंग्रजी व मराठी स्वरूपातील मागणीपत्र नागरिकांना पाहता येणार आहे, असे पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.