पिंपरी : राज्यात विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास सुरुवात होताना दिसत नाही.
मागील काही दिवसापासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्यानी फलबाजीतून शहर विद्रुप करुन ठेवले आहे. आघाडी, युती, महाआघाडी, अपक्ष अशा सर्वच राजकीय आघाड्यांवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरात पक्षीय मेळावे, सभांच्या आयोजनातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात झाली होती. त्याचबरोबर फलकबाजीला शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ऊत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातून फुकटी फलकबाजी बोकाळत असून शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरात ७२ तासांत शहर फलकमुक्त व्हावे अशी अपेक्षा आहे.
पिंपरी चिंचवड शहरात चौकाचौकांत फुकट्या बॅनरबाजीमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. एरवी अनधिकृत होर्डिंग लावले की महापालिकेचे अतिक्रमण विभागाकडून तात्काळ कारवाई होत होती. मात्र, राजकीय नेत्यांनी चौकांचे विद्रुपीकरण होत असताना पालिकेचे कर्मचारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून फक्त पाहण्याची भूमिका घेताना दिसत आले.
शहरातही मागील काही दिवसांपासून आचारसंहिता लागण्यापूर्वीच विविध विभागात व विविध राजकीय पक्षांमार्फत मेळावे, नवरात्र, दसरा, दिवाळी यांच्या शुभेच्छाचे फ्लेक्सबाजी दिसून येत आहे. त्यामुळे शहरात विविध चौकाचौकांत झळकणारी बॅनरबाजी नियमावलीची पायमल्ली करूनच लावलेले दिसून येत आहेत. परंतू यावर कार्यवाही होताना दिसत नाही. तसेच पालिका विभाग अधिकारी कार्यालयाअंतर्गत व महापालिका अतिक्रमण विभागामार्फत अशा फुकट्या फलकबाजीवर कारवाई होताना दिसत नव्हती. आता आचारसंहिता लागून अनेक तास होऊनही शहरातील फ्लेक्स महापालिकेकडून काढताना दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय लोकांचे फायद्यासाठी महापालिकेचे अधिकारी छूपी मदत करतात का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.