नेहमी चर्चेत राहणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. समीर वानखेडे हे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असून ते या पक्षाच्या तिकीटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे दावे केले जात होते. मात्र शिंदेंच्या शिवसेनेने हे दावे फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे आमच्या पक्षात येऊन धारावीमधून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा बातम्या निव्वळ काल्पनिक आहे. या सर्व अफवा असल्याचं शिवसेनेतील (शिंदे) सूत्रांनी एएनआयला सांगितलं.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपा २८८ पैकी जवळवळ १५० जागा लढवण्याचा विचार करत आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं आहे की “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात त्याग करावा लागू शकतो. भाजपाने याआधी युती अबाधित राहावी यासाठी अनेकदा मोठा त्याग केला आहे”. तसेच, ज्या जागांवर आमचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागा आम्ही लढणारच आहोत”, असं भाजपाने म्हटलं आहे. त्याचबरोबर इतर जागांवर चर्चा करताना भाजपाने अनेक जागा मागितल्या आहेत. त्यातच धारावीच्या जागेचाही समावेश आहे.