चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवाराच्या निवडीसाठी चर्चा सुरु आहे. राज्यात महायुती सरकारमधील घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व इच्छुकांनी व भाजपमधील काही माजी नगरसेवकांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या बंधू आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांना एक लेखी पत्र देऊन शंकर जगताप यांच्या उमेदवारीसाठी समर्थन व्यक्त केले आहे. यामुळे शंकर जगताप यांच्या उमेदवारीसाठी पक्षात सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दिसून येते.
भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये जगताप यांच्या कुटुंबामध्ये पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करण्यात विरोधक यशस्वी ठरताना दिसत आहे. भाजप पक्षात शंकर जगताप यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला अधिक बलवान उमेदवाराची आवश्यकता असल्याने या चर्चांना महत्व वाढले आहे. शंकर जगताप यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय प्रक्रिया लवकरच स्पष्ट होईल अशी चर्चा आहे.