मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस गरम होत आहे. जसजशी दिवाळी जवळ येत आहे तसतसे अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत फटाके फोडताना दिसत आहेत. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.
ऐन विधानसभा निवडणुकीत शिंगणे यांनी तुतारी फुंकल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांची पुतणी गायत्री शिंगणे काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार गटाने शिंगणे यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.