पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील स्वच्छता वाढवण्यासाठी “क्लीन पीसीएमसी” उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाअंतर्गत, शहरात ठिकठिकाणी स्टीलच्या छोट्या कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे कचरा योग्यरित्या टाकला जावा आणि शहर स्वच्छ राहावे, असा उद्देश होता.
पण या उपक्रमाचा फोलपणा आता उघड झाला आहे. शाहूनगर येथील बहिरवडे क्रीडांगणात, संभाजीनगर येथील जागर्स पार्कमध्ये या कचराकुंड्या काढून एकत्रित करून ठेवलेल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, या कचरा कुंड्या महापालिकेच्या उद्यानात धुळखात पडलेल्या आहेत. यामुळे न केवळ स्वच्छतेचा उद्देश साधला गेला नाही, तर महापालिकेच्या कामकाजावर आणि कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे की, कचरा कुंड्या ठेवण्याऐवजी त्यांना योग्यरीत्या व्यवस्थापित करण्यात आले पाहिजे. या परिस्थितीवर लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास, शहरातील स्वच्छतेचा मुद्दा आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे. महापालिका याबाबत काय उपाययोजना करणार, हे आता पाहणे महत्त्वाचे आहे.




