पुणे : सोने आणि चांदीच्या भावातील तेजी सोमवारी कायम राहिली. यामुळे सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली. मुंबईत प्रति १० ग्रॅमला सोन्याचा भाव ७८ हजार २१४ रुपयांवर पोहोचला. याचवेळी चांदीचा भावाने किलोला ९७ हजार २५४ रुपये ही सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दरम्यान, पुण्यात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ७८ हजार ८०० रुपये आणि चांदीचा भाव प्रतिकिलो ९९ हजार रुपये होता.
सणासुदीच्या काळामुळे ग्राहकांकडून सोन्याची खरेदी वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. याचवेळी औद्याोगिक मागणी वाढल्याने चांदीचे भाव वाढले आहेत. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ७५० रुपयांनी वधारून ८० हजार ६५० रुपयांवर गेला. याचवेळी चांदीच्या भावात प्रति किलोला तब्बल ५ हजार रुपयांची वाढ होऊन भाव ९९ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या भावात सलग चार सत्रांत वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या भावातील वाढ आणि औद्याोगिक मागणी वाढल्याने चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे, अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली.
वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्सवर सोमवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४९३ रुपयांनी वधारून ७८ हजार २४२ रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रति किलोला २ हजार ८२२ रुपयांची उसळी घेऊन ९८ हजार २२४ रुपयांवर पोहोचला. जागतिक धातू वायदा बाजार मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस २ हजार ७४४ डॉलरवर गेला तर चांदीच्या भावाने ३४ डॉलरची उच्चांकी पातळी गाठली.




