पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी तब्बल ३३५ उमेदवारांनी ७३५ अर्ज घेतले आहेत. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सर्वाधिक ३० उमेदवारी अर्ज आंबेगाव मतदारसंघातून नेण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मंगळवारपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहरात आठ, पिंपरी चिंचवडमध्ये तीन आणि जिल्ह्यात दहा असे एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला, तरी ३३५ इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज हे घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे घेण्यात येणार आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी कर्वेराडवरील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळा, खडकवासलासाठी हवेली तहसील कार्यालय, पर्वती मतदारसंघासाठी महाराष्ट्र मंडळ, कटारीया महाविद्यालय, मुकुंदनगर, हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी हडपसरमधील रयत एज्युकेशन सोसायटी साधना विद्यालय, पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातील उमेदवारी अर्ज हे अल्प बचत भवन, विधान भवनाजवळ कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज हे गणेश कला क्रीडा मंच येथील प्रदर्शन हॉलमध्ये स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.



