पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून जुन्नरचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. निवडणुकीसाठी पक्षाकडून दिला जाणारा ‘एबी’ फॉर्म त्यांना अजित पवार यांनी दिल्याने ते राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेनके यांच्याविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा कोण उमेदवार असणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जुन्नर मतदारसंघातील निवडणूक ही राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी होणार असल्याचे बोलले जात होते. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपात जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. या मतदारसंघात अतुल बेनके आमदार असून ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि त्यातही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर अजित पवार यांचे अनेक समर्थक आमदार शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये जुन्नरचे आमदार बेनके यांचाही समावेश होता.




